Home राजकीय महाराष्ट्रात ‘असे’ काही घडणार नाही- शिवसेना

महाराष्ट्रात ‘असे’ काही घडणार नाही- शिवसेना

0
28

मुंबई प्रतिनिधी । संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त करून महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची सुतराम शक्यता नसून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागावे असा सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामना मध्ये संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्याने संसदीय लोकशाहीच्या परंपरा राखून काम केले तर तो शॅडो मुख्यमंत्री असतो व मुख्यमंत्र्यांइतकेच विरोधी पक्ष नेत्याकडे प्रश्‍न व माहिती घेऊन लोक तसेच अधिकारी येत-जात असतात, पण फडणवीस या कामात अपयशी होताना दिसत आहेत. त्यांच्याकडे अर्धवट माहिती आहे. मुळात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उत्तम परस्पर संवाद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत विसंवाद होणार नाही याची खात्री महाराष्ट्राला आहे. संवादाचे धोरण नीट राबवले असते तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते. त्यामुळे संवाद कौशल्याचे धडे श्री. फडणवीस यांनी महाविकास आघाडीस द्यायची गरज नाही. संवाद कौशल्याबाबतचे एक शिबीर रामभाऊ म्हाळगी संस्थेत ठेवून त्यात भाजपातील अनेक नेत्यांनी सहभागी व्हावे, असे एकंदरीत वातावरण आहे.

अग्रलेखात पुढे नमूद केले आहे की, फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा भूषवले आहे. एकदा पाच वर्षे व दुसऱयांदा ८० तास. त्या ८० तासांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, कारण ८० तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत संवाद साधूनही महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे. भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील १०५ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल? नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची माजी ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो असा खोचक सल्ला यात देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound