बीड (वृत्तसंस्था) महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीआर लागू करु नये, अशी ते मागणी करणार आहेत.
बीडच्या बशीरगंज भागात सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाला समर्थन दर्शवत ‘भीम आर्मी’च्या चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलनाला आज भेट दिली. सीएए, एनआरसी आणि एनपीआर लागू करु नये, म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच हळूहळू जनता जागी होत आहे. आगामी काळ ‘इन्कलाब’चा असेल. मोठ्या प्रमाणात आंदोलन होत राहील, असे सांगत आझाद यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली. तसेच देशात एकता, शांती आणि बंधूभाव राखण्यासंदर्भात एक प्रतिज्ञा देखील चंद्रशेखर आझाद यांनी उपस्थितांकडून वाचून घेतली.