विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवार

ajit pawar

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते.

वर्ष २०२० मध्ये विधानपरिषदेतील अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदार महाविकास आघाडीतर्फे निवडले जातील. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारा नेत्याची आवश्यकता होती. या पार्श्‍वभूमिवर, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजचे कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. ते सुभाष देसाई यांच्या जागी नेते म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, यासोबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. यात शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपाचे अनिल सोले, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि काँग्रेसचे सुधीर तांबे यांचा समावेश आहे. हे आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहतील.

Protected Content