नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये “घाणेरडे चित्रपट” पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर होतो,असे म्हणत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंदीचे समर्थन केले आहे.
सारस्वत यांनी म्हटले की, सोशल मीडियाचा ते आगीप्रमाणे वापर करतात. त्यामुळे जर तिकडे इंटरनेट नसेल तर काय फरक पडतो? तसेही इंटरनेटच्या माध्यमातून तिकडे लोक काय पाहतात? घाणेरडे सिनेमे पाहण्याशिवाय लोक काहीही करत नाहीत. या विधानानंतर काही वेळातच सारस्वत यांनी आपल्या विधानावर सारवासारव करताना म्हटले की, मला हे म्हणायचेय की, इंटरनेट जरी उपलब्ध नसलं तरी त्याचा अर्थव्यवस्थेवर काही विशेष फरक पडणार नाही. जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीमुळे एकीकडे जम्मू काश्मीरमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडथळे येत आहेत. माध्यमांनाही माहितीची देवाणघेवाण करण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहारही करणे बंद आहे. असे असताना सारस्वत यांच्या या विधानाने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यात सारस्वत यांच्या विधानावर टीका होत आहे.