धरणगाव (प्रतिनिधी) मराठी भाषा ही अतिशय समृध्द भाषा आहे. या भाषेतील शब्दांना विविध अर्थ, अनेक छटा आहेत. निखळ विनोद हा भाषेचा अलंकार आहे. वात्रटिका, विडंबन, कोट्या यातून विनोदाची निर्मिती होवून हास्य फुलते. हसण्याने माणसाचं मन प्रसन्न होतं,असं प्रतिपादन खान्देशातील प्रसिद्ध वात्रटिकाकार विलास पाटील (खेडीभोकरीकर) यांनी केले. येथील पी. आर. हायस्कूलमध्ये आयोजित मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त आयोजित “हास्य-भेळ” कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विलास पाटील यांच्या कार्याचा परीचय करुन दिला. आपल्या विविधांगी सादरी करणातून पाटील यांनी दिडतास विद्यार्थ्यांना हास्यधारेत चिंब भिजवले. मोजून दोनदा घंटा वाजवायचा एक म्हातारा. मंदिरात येता जाता, नंतर माहित पडलं, तो म्हणे एस् .टीचा रिटायर्ड कंडक्टर होता. या व भूगोलाचे शिक्षक, खा- खा खायचे. पृथ्वीच्या आकारासाठी, खुशाल ढेरीचे उदाहरण द्यायचे. या वात्रटिका दाद घेवून गेल्या. अरे टक्कल टक्कल, नको कंगवा नको तेल. दर महिन्याला खर्च, कटिंगचा ही वाचेल. या व झुकूझुकू आगिनगाडी, धुरांच्या रेषा आता न काढी. उजाड जंगले पाहू या, मामाच्या गावाला जाऊया या विडंबन गीतांना टाळ्या घेतल्या. पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा. मरण धाड देवा आता, मरण धाड देवा. या गीताने पतींची व्यथा मोकळी केली. एअर होस्टेसला हवाई सुंदरी म्हणतात तर मग नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये ? अशा कोटया, धम्माल विनोदी किस्से, बोलण्याच्या विनोदी त-हा, विनोदी म्हणी सांगत लोटपोट हसवले. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक आर. के. सपकाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. व्हि. बी. गालापुरे यांनी तर आभार प्रदर्शन शरदकुमार बन्सी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर.जी.खैरे, एन. सी. पाटील, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वाय.पी.नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी परीश्रम घेतले.