मोठी बातमी : जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढविणार शरद कोळी !

धरणगाव-अविनाश बाविस्कर | शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे नेते तथा युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

धरणगाव येथे महाप्रबोधन येथील यात्रेनिमित्त झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांचे भाषण तुफान गाजले होते. यात त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना टार्गेट करून अपशब्दांचा वापर केल्याने खळबळ उडाली होती. यामुळे त्यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. तर, कोळी यांच्या भाषणामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व गुजर समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. या जामीनाच्या कागदपत्रांशी संबंधीत कामासाठी आज शरद कोळी हे धरणगावात आले होते.

धरणगावात शरद कोळी यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपण २०२४ सालची निवडणूक ही जळगाव ग्रामीण मतदारसंघातून लढवणार असून आपण ना. गुलाबराव पाटील यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले. शरद कोळी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगाव ग्रामीणमधून महाविकास आघाडीकडून आधीच अनेक उमेदवार रांगेत असतांना शरद कोळी यांनी स्वत: येथून इच्छुक असल्याचे सांगितल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content