वाराणसी वृत्तसंस्था । वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी भाविकांना विशेष पोशाख परिधान करावा लागणार आहे. तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या धर्तीवर देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवास स्पर्श करण्याअगोदर, पुरूषांना धोतर व महिलांना साडी नेसावी लागणार आहे. तरच तुम्हाला काशी विश्वनाथाचे दर्शन घेता येणार आहे.
या नव्या ड्रेसकोडनुसार, काशी विश्वनाथ मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी नेसावी लागणार आहे. हे पारंपरिक वस्त्रे परिधान करून गेल्यानंतरच भाविकांना देवाला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता जीन्स, पॅंट, टी-शर्ट आणि सूट परिधान केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे, पण देवाला स्पर्श करून दर्शन घेण्याची परवानगी मिळणार नाही.
दर्शनाची वेळ वाढवली
काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनासाठी ड्रेसकोड लागू करण्याच्या निर्णयासह गाभाऱ्यात जाऊन देवाच्या स्पर्श दर्शनाची वेळही वाढवण्यात आली आहे. यासंबंधीचा निर्णय रविवारी मंदिर प्रशासन आणि काशी विद्वत परिषद यांच्यातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री नीळकंठ तिवारी देखील उपस्थित होते. मंदिरात स्पर्श दर्शनासाठी रोज एका तासाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मकर संक्रांतीनंतर या वेळेत वाढ करून ती सात तास करण्यात येणार आहे.