मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सत्ता हेच टॉनीक असणार्या भाजपचे टॉनीक संपल्याने बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली असल्याचा खोचक टोला आज शिवसेनेने भाजपला मारला आहे. सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून हे शरसंधान करण्यात आले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखातून भाजवर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहर्यावरील मेकअप उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बर्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांत निवडणुका झाल्या. त्यात धुळ्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली. पालघर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता गेली आहे. सगळयात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
यात पुढे म्हटले आहे की, नागपुरातील पराभव हा सगळयात मोठा दणका आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे टॉनिक होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार? असा प्रश्न या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.