आम्ही एकत्रच ! : खडसे व महाजनांची ग्वाही

जळगाव प्रतिनिधी । आम्ही एकत्र असून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एकत्रीतपणे सामोरे जात असल्याचा संदेश आज माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांनी दिला. ते कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

काल एकनाथराव खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपले तिकिट कापल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर गिरीश महाजन यांनी सफाई देऊन आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, पक्ष कार्यालयात आयोजित कोअर समितीच्या बैठकीत हे दोन्ही नेते एकत्र आले. यानंतर एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांनी एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतले. यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी एकापेक्षा जास्त नावे आली असून उद्या ऐन वेळी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तर खडसे आणि महाजन यांनी आपण एकत्र असून पंचायत समितीप्रमाणे जिल्हा परिषदेतही भाजपचा झेंडा फडकणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, खडसे यांनी आपण तिकिटाबद्दल नव्हे तर फडणवीस आणि महाजन यांच्या नाराजीबाबत भाष्य केले होते असे सांगितले. तर महाजन यांनीही आम्ही सर्व जण एकत्र असल्याचे सांगितले.

Protected Content