अयोध्या, वृत्तसंस्था | अयोध्येतील पंचक्रोशी परिक्रमेच्या परिघाबाहेर उत्तर प्रदेश सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. पंचक्रोशी परिक्रमेबाहेरील पाच जागा मशिदीसाठी सुचवण्यात आल्या आहेत. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीसाठी या जागांची यादीही पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी मशिदीच्या उभारणीसाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते.
अयोध्येनजीक असलेल्या महामार्गाजवळील पाच जागा मशिदीसाठी सुचवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सुचवण्यात आलेल्या जमिनीची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्या-फैजाबाद महामार्ग, अयोध्या-बस्ती रोड, अयोध्या-सुल्तानपुर रोड, अयोध्या-गोरखपूर रोड, आणि आणखी एक जागा सुचवण्यात आली आहे. या जागा पंचक्रोशी परिक्रेमेच्या परिघाबाहेर बाहेर निश्चित करण्यात आल्या आहेत. हिंदू आणि मुस्लीम समाजाचे उत्सव एकाचवेळी आल्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या जागा सुचवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
महामार्गानजीक असलेली जमिन मशिदीसाठी उत्तम पर्याय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहराचा सर्वाधिक भाग हा पंचक्रोशी परिक्रमेच्या परिघात येत असून अशा परिस्थितीत यापेक्षा अन्य पर्याय निवडणे अशक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देत वादग्रस्त जमिन राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय दिला होता. तसंच मशिदीच्या उभारणीसाठी ५ एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं विरोध केला होता. मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारण्यासही विरोध असल्याचं मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस जफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, सरकारनं दिलेला प्रस्तावावर सुन्नी वक्फ बोर्डाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.