नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारती एअरटेलने किमान मासिक रिचार्ज प्लॅन महाग केल्यामुळे महिनाभर सेवा सुरू ठेवण्यासाठी एअरटेल ग्राहकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. भारती एअरटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल रेटच्या किंमतीत वाढ करत आहे. एअरटेलने दुसऱ्यांदा आपल्या मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ केली आहे.
कंपनीने आपल्या सर्व बेस रिचार्जच्या किंमती बदलून नवी किंमत लागू केल्या आहेत. जर तुम्हाला एअरटेल नेटवर्कसोबत जोडून राहायचे असेल तर तुम्हाला किमान 45 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असणार आहे. यापूर्वी हा रिचार्ज 35 रुपयांचा होता. याचा अर्थ आता ग्राहकाला दहा रुपये अधिक मोजावे लागणार आहे.
ग्राहकांना जर कॉलिंग करायची असेल तर त्यांना कमीत कमी 1.50 रुपये प्रति मिनिट द्यावे लागणार. याचा अर्थ 2.5 पैसे प्रति सेकंद द्यावे लागणार. त्यासोबतच एअरटेलने SMS चे दरही वाढवले आहेत. ग्राहकाला आता SMS साठी 1 रुपये आणि STD SMS साठी 1.50 रुपये द्यावे लागणार आहे. यापूर्वी 4 डिसेंबर रोजी टेलिकॉम कंपनीने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत 40 टक्क्यांची वाढ केली होती. आता दुसऱ्यांदा एअरटेलने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे.