चेन्नई (तामिळनाडू) देशात सध्या कांदा मोठ्या प्रमाणात महागला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झालीय. अनेक राज्यामध्ये कांद्याचे भाव 100 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक आहेत. अशामध्येच तामिळनाडूमधील एका दुकानदाराने एका स्मार्टफोनसोबत एक किलो कांदे मोफत देण्याची ऑफर देऊन धमाल उडवून दिली आहे.
एसटीआर मोबाईलचे मालक सतीश अल यांच्या या अनोख्या कल्पनेमुळे राज्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सतीश अल स्मार्टफोन खरेदीवर 1 किलो कांदे मोफत देत आहेत. अल यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना सांगितले की, आम्हाला लोकांसाठी काहीतरी करायचे होते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही विचार केला की, स्मार्टफोनसोबत कांदे मोफत देऊ. आतापर्यंत अनेकांनी आमच्या दुकानाला भेट दिली असल्याचेही त्यांनी सांगीतले. तर मी स्मार्टफोन खरेदी केल्यावर माझ्या एका हातात दुकानदाराने स्मार्टफोन तर दुसऱ्या हातात कांदे दिले. वाढत्या कांद्यांच्या भावामुळे मला मोफत मिळालेले कांदे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असे एका ग्राहकाने सांगितले.