मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आज सकाळी राऊत यांनी हा दावा केला.
राज्यात महाआघाडीची मोट बांधणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. गोव्यात सध्या भाजपाचे सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत.