कोलकाता वृत्तसंस्था । दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमारचे विंडीजविरुद्ध वनडे व टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. गुरुवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर कर्णधार विराट कोहली देखील संघात परतला आहे. कोहलीने यापूर्वी बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेतून माघार घेतली होती.
बांगलादेशविरुद्ध टी-20 पदार्पण करणा-या शिवम दुबेला आता वनडे पदार्पणाचीही संधी मिळाली आहे. आघाडीचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी टी-20 संघात परतला असून खलील अहमदला आपली जागा गमवावी लागली आहे. कुलदीप यादवला कृणाल पंडय़ाच्या जागी पसंती देण्यात आली आहे. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर यापूर्वी धोंडशिरेच्या दुखापतीवर उपचार करुन घेत होता. शिवाय, भारतीय संघ ऑगस्टमध्ये विंडीज दौऱयावर असताना त्यावेळीही त्याला तंदुरुस्तीच्या समस्यांचा सामना करावा लागला होता.
असे असणार सामने
भारतीय संघ विंडीजविरुद्ध 3 टी-20 सामने खेळणार असून यातील पहिली लढत मुंबईत दि. 6 डिसेंबर रोजी होईल. त्यानंतर तिरुअनंतपूरम (8 डिसेंबर) व हैदराबाद (11 डिसेंबर) येथे उर्वरित दोन टी-20 सामने होतील. या टी-20 मालिकेनंतर उभय संघात चेन्नई (दि. 15 डिसेंबर), विशाखापट्टणम (दि. 18) व कटक (दि. 22 डिसेंबर) येथे अनुक्रमे 3 वनडे होतील.
भारतीय वनडे संघ :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, केदार जाधव, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.
भारतीय टी-20 संघ :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर.