चाळीसगाव मुराद पटेल । आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचाली वेगवान होत असतांनाच भाजप व राष्ट्रवादीतर्फे उमेदवारांची उत्सुकताही वाढीस लागली आहे. यात विद्यमान घटनांचा कल हा प्रत्यक्षात उतरला तर ही लढत उन्मेष पाटील विरूध्द प्रमोद पाटील अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आधीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आघाडी झालेली असून दुसरीकडे भाजप व शिवसेनेतही युती होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे आता उमेदवारी कुणास मिळणार याबाबत उत्सुकता वाढीस लागली आहे. भाजपतर्फे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांच्याऐवजी नवीन चेहर्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती कधीपासूनच समोर आली आहे. त्यांच्याऐवजी नवीन उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जळगाव येथील अभियंता प्रकाश पाटील यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाची चर्चादेखील सुरू झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आमदार उन्मेषदादा हे लोकसभेचे उमेदवार ठरू शकतात. त्यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कामाची छाप उमटवली असून यासाठी त्यांना लोकसभेच्या व्यापक पटलावर काम करण्याची संधी यामुळे मिळू शकते. तर उन्मेष पाटील यांना लोकसभेचे तिकिट मिळाल्यास त्यांचे परममित्त मंगेश चव्हाण यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
एकीकडे भाजपमध्ये उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीबाबत खल सुरू असतांना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडेही उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील महानंदचे माजी संचालक तथा दूध संघाचे विद्यमान संचालक प्रमोद पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. प्रमोद पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून मतदारसंघात जनसंपर्कदेखील सुरू केला आहे. प्रमोद पाटील हे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. येथे एक योगायोग असा की, उन्मेष पाटील हे आपल्या मित्रासाठी विधानसभेची जागा खाली करू शकतात तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजीव देशमुख हे आपल्या मित्राला थेट लोकसभेत पाठविण्याच्या तयारीत आहेत. अर्थात, चाळीसगावच्या राजकीय मैदानात असणारी लढाई ही या माध्यमातून लोकसभेच्या मैदानातही खेळली जाऊ शकते.
याआधी पारोळा येथील उमेदवारांमध्ये लोकसभेच्या मैदानात टक्कर झालेली आहे. आमदार उन्मेषदादा पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून हीच लढाई चाळीसगावकरांमध्ये होऊ शकते. याशिवाय, एम.के. अण्णा पाटील यांच्यानंतर लोकसभेत चाळीसगावला न मिळालेल्या प्रतिनिधीत्वाची भरदेखील यातून निघणार आहे. अर्थात, असे व्हावे हीच चाळीसगावकरांची इच्छा आहे. मात्र या योग जुळून येणार का? याबाबत लवकरच दोन्ही पक्षांचा निर्णय समजणार आहे.