धरणगाव (प्रतिनिधी) गुलाबराव पाटील मैदान सोडणारे नेते नाहीत. आम्ही इंच-इंच लढू आणि विजयी देखील होऊ. नुसतं नावात वाघ असलं म्हणून कुणी वाघ होत नाही. त्यामुळे जे स्वत: शेळी होऊन घरात बसले आहेत. ज्यांना पक्षात कोणी विचारात नाहीय. त्यांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना लगावत जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. एवढेच नव्हे, तर लोकसभेला तिकीट कापले तेव्हा ना.गिरीश महाजन यांच्या नावाने खडे फोडणाऱ्यांना कधी पासून त्यांच्याबाबत एवढे प्रेम ऊतू आले?, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या दिवशी ना. गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात बंडखोरांच्या विषयावरून जोरदार वाद झाला होता. यावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सोमवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कडवट टीका केली होती. याच टीकेलाशिवसेना युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी जोरदार प्रतीउत्तर दिले आहे. वाघ यांनी म्हटले आहे की, उदय वाघ यांच्या धर्मपत्नी स्मिताताई वाघ यांची लोकसभेची उमेदवारी कापल्यानंतर वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. गिरीशभाऊंवर अप्रत्यक्ष आरोप लावणारे लोकचं आज आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आमच्या गुलाबभाऊंवर आरोप करत आहेत. त्यांना वाटते असं केल्याने आपण गिरीश महाजन यांच्या गोटात सामील होऊ. गिरीशभाऊशी जवळीक साधण्यासाठीच उदय वाघ केवीलवाणी धडपड करीत आहेत.
अमळनेर येथील जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात ज्यांनी भर व्यासपिठावर आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याला लाथाबुक्क्यांनी तुडवला. त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये. त्यावेळी व्यासपिठावर धावून जाणारे कोणाचे कार्यकर्ते होते? त्यावेळी गिरीशभाऊंच्या मदतीला कोण धावून आले होते, हे उदय वाघ यांनी विसरू नये. त्यावेळी राज्यमंत्री गुलाबभाऊच यांनीच गिरीशभाऊंना मदत केली होती. त्त्यांच्या मदतीला धावून गेले होते. आणि आज तेच उदय वाघ शिवसेनाला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करताय. उदय वाघ यांनी लक्षात ठेवावे. नुसतं नावात वाघ असलं म्हणून कुणी वाघ होत नाही. आम्ही शिवसेनेचे वाघ आहोत. आमच्या नादी भले-भले लागत नाही. मी तर शिवसैनिक प्लस वाघ देखील आहे. त्यामुळे यापुढे नको त्या विषयात नाक खुपसलं तर गाठ शिवसेनेशी असल्याचा इशाराही योगेश वाघ यांनी भाजपच्या उदय वाघ यांना दिला आहे.