मुंबई प्रतिनिधी । जम्मू-काश्मीरमधील “पोस्ट-पेड” मोबाइल सेवा तब्बल ७२ दिवसांनंतर सोमवारपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे ही सेवा घेणाऱ्या ४० लाख ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी इंटरनेट सेवा मात्र बंदच आहे.
केंद्र सरकारने शनिवारी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोमवारपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल सेवा सुरू झाली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर पाच ऑगस्टपासून राज्यातील मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आली होती. तूर्त फक्त पोस्टपेड ग्राहकांची मोबाइल सेवा सुरू झाली आहे. फक्त एसएमएस आणि कॉल यांच्यासाठीच ही सेवा सुरू झाली आहे. राज्यात इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे व्हॉट्सअॅप आणि इतर सेवा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे प्रीपेड सेवा वापरणारे २५ लाख ग्राहक अजूनही मोबाइल सेवेपासून वंचित आहेत.