चोपडा (प्रतिनिधी) । चोपडा विधानसभेची जागा अखेरच्या क्षणी भाजपकडे येऊ शकते असे संकेत पक्षाकडून मिळाले होते. त्या आधारावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र राज्यात आघाडी झाल्याने चोपडा विधानसभा मतदार संघाची जागा ही भाजपाला न मिळता शिवसेनेला देण्यात आली. अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मगन बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाचे काही स्थानिक पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावर नकली सोने घालून उमेदवारी मागणाऱ्या नवखे इच्छुक उमेदवारांना बढेजाव करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित राहावे लागते. त्यांची वाताहत होत असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले. तसेच भाजपाच्या विरोधात आपली कोणतीही भूमीका नाही. पक्षाशी माझी एक निष्ठता कायम असून स्थानिक पातळीवरील उमेदवारालाच कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी स्थानिक उमेदवार म्हणून हा माझा लढा आहे. असे देखील त्यांना पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला कृउबा समितीचे संचालक धनंजय पाटील, पं.स.चे माजी सभापती मुरलीधर बाविस्कर, अजय राजपूत, राजेंद्र दाभे, भरत कोळी, भरत पाटील आदी उपस्थित होते.