फैजपूर, प्रतिनिधी | फैजपूरची पावनभूमी क्रांतीकारकांसाठी तीर्थक्षेत्र होती, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज (दि.४) येथे व्यक्त केले. येथील धनाजी नाना महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी होते.
श्री.गांधी पुढे म्हणाले की, गांधीजी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, त्यांच्यावर या देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यांना देशासाठी जे करायचे होते ते करून गेले. आज त्यांच्या विचारांचे संरक्षण करण्याची गरज आहे. आजच्या असुरक्षित वातावरणात गांधी विचारांची जास्त गरज आहे. गांधी वाचायला जेवढे सोपे आहेत तेवढेच आचरणात आणायला कठीण आहेत. गांधी विचार हे प्रत्येकाला आपले आत्मस्वरूप दाखवतात. गांधी विषयक विचार खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असतील तर गांधी साहित्याचे सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे ज्यांचा अभ्यास नाही ते वरवरची व उथळ मते त्यांच्या विषयी मांडतात.
१९३६ ला याच पवित्र भूमीवर काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले होते, तेव्हा स्वातंत्र्य कार्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी याठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली होती व स्वातंत्र्याच्या कार्यासाठी काय-काय योगदान आपल्याला देता येईल, याविषयी जबाबदारी निश्चित केली होती. अशा या पवित्रस्थळी आपल्याला गांधी प्रेमी श्रोत्यांसमोर विचार व्यक्त करायला मिळाले याबद्दल धन्यता व्यक्त केली तसेच गांधी विचारा संबंधातील असंख्य विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न वा शंकांचे निरसन त्यांनी समर्पक उत्तरे देऊन केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी यांनी महात्मा गांधी या पवित्र भूमीत येण्यामागे थोर स्वातंत्र्यसेनानी धनाजी नानांचे कार्य कारणीभूत होते. त्यांनीही गांधी विचारांचा प्रचार, प्रसार करून दीनदलित आदिवासींसाठी सेवाभावी वृत्तीने काम केले म्हणूनच त्यांचाही गांधीजींप्रमाणेच खून करण्यात आला. पण महापुरुषांना संपवून त्यांचे विचार संपवता येत नाहीत, त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही महाविद्यालयाची पवित्र भूमी होय तसेच आपल्या महाविद्यालयात गांधी विचारांची अतिशय समृद्ध अशी पुस्तके आहेत. त्यांचे वाचन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ. जगदीश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. मनोहर सुरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली होती.