न्यूयॉर्क, वृत्तसंस्था | भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान हे दोघेही एकाच दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी या दोन्ही नेत्यांची भाषणे होणार आहेत. यावेळी इम्रान खान हे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. यावेळी आधी मोदींचे भाषण होणार असल्याने त्यानंतर इम्रान खान काय भुमिका मांडणार, याकडे सर्व जगाचे लक्ष असेल.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. २४ ते ३० सप्टेंबर या काळात संयुक्त राष्ट्रांची ही ७४ वी वार्षिक महासभा पार पडणार आहे. यामध्ये भाषण करणाऱ्या जागतिक नेत्यांची प्राथमिक यादीही तयार असून यामध्ये ११२ देशांचे प्रमुख, ४८ सरकारांचे प्रमुख आणि ३० हून अधिक परराष्ट्र मंत्री न्यूयॉर्कमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण असेल त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण असेल. मोदींनी यापूर्वी या सभेत २०१४ मध्ये संबोधित केले होते.
न्यूयॉर्क दौऱ्यादरम्यान २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिल गेट्स अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या ‘ग्लोबल गोलकिपर अवॉर्ड-२०१९’ या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील उद्देश साध्य करण्यासाठी मोदींनी भारतात केलेल्या प्रभावशाली कामासाठी त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सार्वजनिक स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे त्यांना ही नवी ओळख मिळणार आहे.
२४ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात ‘इकॉनॉमिक अॅण्ड सोशल काऊन्सिल चेंबर’च्या ‘लीडरशीप मॅटर्स : रिलेवन्स गांधी इन कन्टेम्पररी वर्ल्ड’या विशेष कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी ‘ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस समिट’मध्येही मोदी भाषण करणार आहेत. यानंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही असणार आहे. दरम्यान, मोदी ‘गांधी पीस गार्डन’चाही शुभारंभ करणार आहेत. हे गार्डन राष्ट्रपिता महात्मा गांधींना समर्पित आहे. ही एक अशी योजना आहे, ज्यामध्ये लोक आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये एक रोप लावतात.