बेंगळुरू, वृत्तसंस्था | चांद्रयान-२ च्या संदर्भात एक आनंदाची बातमी इस्रोने आज (दि.९) दिली आहे. या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, विक्रम लँडर नियोजित जागेजवळच उभा आहे. त्याचे नुकसान झालेले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर तो किंचितसा तिरका उभा आहे.
या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘विक्रमने हार्ड लँडिंग केली आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवले आहे, त्यानुसार कळते की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभा आहे. त्याची तुट-फूट झालेली नाही.’इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी ही माहिती मिळाल्यानंतर सांगितले की, विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची अजूनही ६० ते ७० टक्के शक्यता आहे.
इस्रोच्या अन्य एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणे कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली असल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, “आम्हाला जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये हरवलेले एक स्पेसक्राफ्ट शोधण्याचा अनुभव आहे. पण विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. तेथे तशी ऑपरेशन फ्लेक्झिबिलीटी नसल्याने आम्ही त्याला जागेवरून हलवू शकत नाही. जर त्याच्या अँटिनाची दिशा ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरकडे असेल तर आमचे काम सोपे होईल.’ विक्रम ऊर्जा वापरत आहे, मात्र त्यावर सौर पॅनल लावल्याने त्याची चिंता नाही.”