जामनेर प्रतिनिधी । मतपत्रिकेवर आपल्याला पराजीत करून दाखवा असे आव्हान पुन्हा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना दिले आहे. ते शेंदुर्णी येथील कार्यक्रमात बोलत होते.
जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. महाजनादेश यात्रेत ना. गिरीश महाजन यांनी पारोळ्यातून डॉ. पाटील यांना हरविणार असल्याच्या संकल्पाचा पुनरूच्चार केला. यानंतर डॉ. सतीश पाटील यांनीदेखील जामनेर मतदारसंघातील शेंदुर्णी येथील कार्यक्रमात त्यांना प्रतिआव्हान दिले. शेंदुर्णी खरेदी-विक्री संघाच्या मंगल कार्यालयाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी जोरदार टोलेबाजी करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन आपल्याला पारोळा मतदारसंघातून पराभूत करून दाखवा असे ना. महाजन यांना चॅलेंज केले. जामनेर तालुका अजूनही टँकर मुक्त होऊ शकलेला नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. तर चांगली कामे केली असतांनाही महाजनादेश यात्रेची गरज काय ? असा सवाल उपस्थित करत भाजपवर टीकास्त्र सोडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांची उपस्थिती होती. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार शिरीष चौधरी, रवींद्र पाटील, डॉ. उल्हास पाटील, संजय गरुड, प्रदीप लोढा, उत्तमराव थोरात आदी उपस्थित होते.