Home Cities अमळनेर महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अमळनेरात तीन दिवसीय प्रबोधन व्याख्यानमाला

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अमळनेरात तीन दिवसीय प्रबोधन व्याख्यानमाला

0
1


 अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त अमळनेर येथे तीन दिवसीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आणि पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत ही व्याख्यानमाला होणार आहे. संविधान, लोकशाही, सामाजिक विद्रोह, सत्यशोधक स्त्रीवाद, जातवास्तव आणि सामाजिक न्याय अशा महत्त्वपूर्ण विषयांवर या माध्यमातून विचारमंथन होणार असून, पत्रकार अशोक वानखेडे, डॉ. दीपक पवार आणि प्रा. प्रतिमा परदेशी हे मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या (१८२७–२०२७) पार्श्वभूमीवर ‘२०० वे विचारांचा वारसा, समतेच्या भविष्यसाठी’ हा विचार घेऊन या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांनी समाजाला दिलेला समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे चिकित्सक आकलन निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या व्याख्यानमालेत नामवंत पत्रकार, लेखक, विचारवंत आणि सामाजिक अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.

व्याख्यानमालेचा प्रारंभ सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘संविधान, लोकशाही आणि जनतेचा आवाज’ या विषयावर ते मार्गदर्शन करतील. लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे महत्त्व, नागरिकांचा सहभाग आणि जनतेच्या प्रश्नांना मिळणारे स्थान या अनुषंगाने त्यांच्या व्याख्यानातून विचार मांडले जाणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रणजित शिंदे उपस्थित राहणार असून, ते मुख्याध्यापक तसेच अमळनेर अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व संचालक आहेत. यासोबतच IKD मॅथ्स अकॅडमी, अमळनेरचे संचालक किरण माळी सर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मंगळवार, १ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठातील सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘समकालीन महाराष्ट्रातला विद्रोह’ या विषयातून ते महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणार आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्रोहाची संकल्पना, त्यामागील भूमिका आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा वेध त्यांच्या व्याख्यानातून घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथील प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित राहतील. बुधवार, २ डिसेंबर रोजी व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांचे व्याख्यान होणार आहे. ‘सत्यशोधक स्त्रीवाद, जातवास्तव आणि सामाजिक न्याय’ या विषयावर त्या आपले विचार मांडतील. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून वेध घेत जातवास्तव, स्त्रियांचे प्रश्न आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर त्या मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, अमळनेरच्या मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता कापडणेकर आणि अमळनेर नगरपरिषदेच्या नगरसेविका प्रा. योगिता पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या व्याख्यानमालेच्या आयोजनामागे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोककल्याणाची भावना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. ‘बुडता हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणोनिया ॥’ या अभंगातून व्यक्त होणारी समाजाप्रतीची कळकळ आणि लोकहिताची भूमिका या उपक्रमाला प्रेरणा देत आहे. संत परंपरेतील मानवतावादी विचार, महात्मा फुले यांचा सत्यशोधक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांचा परस्परसंबंध या व्याख्यानमालेतून अधोरेखित केला जाणार आहे. या तीनही दिवसांची व्याख्याने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि प्रबोधनपर विचारांमध्ये रुची असलेल्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound