जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांवरील अभ्यास, परीक्षा, स्पर्धा आणि कौटुंबिक परिस्थितीचा वाढता मानसिक ताण लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नियमित वर्ग सुरू होण्यापूर्वी दररोज १० मिनिटांचा ‘आनंदी बालमन’ उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा महानगर चिटणीस आशिष उत्तमराव सपकाळे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक विकास आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, कौटुंबिक परिस्थिती आणि इतर विविध कारणांमुळे मानसिक ताण निर्माण होत आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील भावना, अडचणी आणि समस्या शिक्षक किंवा पालकांसमोर मोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याकडे आणि भावनिक विकासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शाळेत आल्यानंतर लगेच अभ्यासाला सुरुवात करण्याऐवजी विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न, उत्साही आणि तणावमुक्त होण्यासाठी दररोज वर्ग सुरू होण्यापूर्वी १० मिनिटांचा ‘आनंदी बालमन’ उपक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात दिवसाची सुरुवात करता येईल, तसेच अभ्यासातील एकाग्रता आणि वर्गातील सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये सात प्रकारच्या कृती राबविण्याचे सुचविण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आवडणारी प्रेरणादायी गाणी, बालगीते किंवा देशभक्तिपर गीते लावून हलक्या स्वरूपातील आनंददायी हालचाली व नृत्य करण्याची संधी देणे, तसेच मजेदार गोष्टी, कोडी आणि विनोदांच्या माध्यमातून हास्य फुलविणे यांचा समावेश आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना ‘कालच्या दिवसातील माझा आनंदाचा क्षण’, ‘आज मला कशाचा आनंद आहे?’ किंवा ‘मला कोणत्या गोष्टीची चिंता वाटते?’ अशा विषयांवर मनमोकळेपणाने बोलण्याची संधी देण्यात यावी. छोट्या प्रेरणादायी गोष्टी, महापुरुषांचे विचार आणि आत्मविश्वास वाढविणारे संदेश यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यावरही भर देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी सोपे श्वसनाचे व्यायाम, शांत बसण्याचा सराव आणि मन प्रसन्न करणाऱ्या कृती शिकविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी नियमित संवाद साधावा, असेही निवेदनात म्हटले आहे. एखादा विद्यार्थी सतत उदास, चिंताग्रस्त किंवा एकटा राहत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला संवेदनशीलतेने मदत मिळवून देण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, अडचणीच्या काळात मदत मागण्यास प्रोत्साहन देणे आणि प्रत्येकाचे जीवन मौल्यवान असल्याचा सकारात्मक विचार रुजविणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सपकाळे यांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मन आनंदी व प्रसन्न राहण्यासोबतच अभ्यासातील एकाग्रता, आत्मविश्वास, वर्गातील सहभाग आणि शाळेविषयीची आवड वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच नियमित संवादामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक अडचणी वेळीच लक्षात येऊन त्यांना योग्य मदत करणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना वर्ग सुरू होण्यापूर्वी दररोज १० मिनिटांचा ‘आनंदी बालमन’ उपक्रम राबविण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करून नियमित आढावा घ्यावा, अशी विनंतीही शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचे मानसिक आरोग्य, आनंद, आत्मविश्वास आणि भावनिक स्वास्थ्य जपणारी शिक्षणव्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने आशिष सपकाळे यांनी ही मागणी पुढे आणली आहे. आता शिक्षण विभाग या प्रस्तावाची दखल घेऊन जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी ‘आनंदी बालमन’ उपक्रमाबाबत काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे.



