Home क्राईम प्रेमविवाहाच्या वादातून वढोदा गावात दोन गटांत हाणामारी; दंगलीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल

प्रेमविवाहाच्या वादातून वढोदा गावात दोन गटांत हाणामारी; दंगलीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल

0
1

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रेमविवाहाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून चोपडा तालुक्यातील वढोदा गावात दोन गटांमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी दंगलीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या फिर्यादीनुसार, रोहिदास व्यंकट पाटील (वय ६७) यांनी दिलेल्या तक्रारीत वासुदेव भोमा पाटील यांच्या मुलीने रोहिदास पाटील यांच्या नातीचा मुलगा सौरव विजय पाटील याच्यासोबत पळून जाऊन लग्न केल्याचे कारण नमूद केले आहे. याच कारणावरून वासुदेव भोमा पाटील, सोपान भोमा पाटील, गोपाल भोमा पाटील, दीपक सोपान पाटील, मच्छिंद्र नारायण पाटील आणि भूषण प्रकाश पाटील यांनी वढोदा गावातील चौकात वाद घातल्याचा आरोप आहे. या वेळी आरोपींनी फिर्यादीच्या गुप्तांगावर लाथ मारून त्यांना खाली पाडल्याचे तसेच बेकायदेशीर जमाव जमवून रोहिदास पाटील, त्यांचे मुलगे रमाकांत व नरेंद्र आणि पत्नी इंदुबाई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत रोहिदास पाटील आणि इंदुबाई जखमी झाले असून, त्यांच्यावर चोपडा येथील नूरसिंह हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यावरून गुरन क्रमांक २२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(१), १९१(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूने वासुदेव भोमा पाटील (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिदास व्यंकट पाटील यांनी मुलीच्या प्रेमविवाहाचा उल्लेख करत चिथावणीखोर वक्तव्य केल्याने वाद चिघळल्याचा आरोप आहे. यावर वासुदेव पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा उल्लेख केल्यानंतर आरोपींनी हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या फिर्यादीनुसार, रोहिदास व्यंकट पाटील, रमाकांत रोहिदास पाटील, नरेंद्र रोहिदास पाटील, इंदुबाई, रमाकांत यांची पत्नी आणि नरेंद्र यांची पत्नी यांनी वासुदेव पाटील यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिमा, बहीण यशोदाबाई, भाऊ मनोहर, पुतणे दीपक व मयूर, मोठा भाऊ गोपाल आणि चुलत पुतणे मच्छिंद्र पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोणीतरी फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याचा व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेल्या वासुदेव पाटील यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या दुसऱ्या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन क्रमांक २२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १९१(१), १९१(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे २१ नोव्हेंबर रोजी नोंदविण्यात आले असून, पहिला गुन्हा सायंकाळी ४.४९ वाजता तर दुसरा गुन्हा सायंकाळी ५.०५ वाजता दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत मोहन कोळ करीत आहेत.

प्रेमविवाहाच्या वादावरून वढोदा येथे दोन गटांत झालेल्या मारहाणीत जखमींवर उपचार सुरू असून, चोपडा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून दंगलीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.


Protected Content

Play sound