Home Cities जळगाव शिव कॉलनी ते १०० फुटी रोड जोडणार वाघनगरला ! आमदार राजूमामा भोळेंच्या...

शिव कॉलनी ते १०० फुटी रोड जोडणार वाघनगरला ! आमदार राजूमामा भोळेंच्या हस्ते भूमिपूजन

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघनगर, पीरबाबा दर्गा आणि कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या रस्ते विकासकामांना अखेर सुरुवात झाली आहे. शिव कॉलनी स्टॉप ते १०० फुटी रोड या महत्त्वाकांक्षी रस्त्यासह परिसराला गाडगेबाबा चौकाशी जोडणाऱ्या मुख्य मार्गाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला. आमदार राजूमामा भोळे, महापौर तथा स्थानिक नगरसेविका दीपमाला काळे यांच्या हस्ते या कामांचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले.

जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास करून नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी राज्य शासनाच्या मागील अधिवेशनादरम्यान निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर शासनाकडून निधी मंजूर झाल्याने आता या महत्त्वाकांक्षी रस्ते विकासकामांचा प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. या विकासकामांमध्ये शिव कॉलनी स्टॉपपासून १०० फुटी रोडपर्यंतच्या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. हा रस्ता वाघनगर परिसर, पीरबाबा दर्गा आणि कोल्हे हिल्स भागाला थेट गाडगेबाबा चौकाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची मोठी सोय होण्याची अपेक्षा आहे.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाघनगर आणि आसपासच्या परिसरातील हजारो नागरिकांना शहरातील प्रमुख भागांशी जोडले जाणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थानिक नगरसेवक विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे, नगरसेविका अंकिता पंकज पाटील यांच्यासह प्रा डॉ नितीन बारी, मनोज सावंत, मनोज भांडारकर, बंटी नेर पगारे, भिकन हिवराडे, योगेश पाटील, मनोज देवरे, आनंद साळी, संदीप जगताप, प्रीतम गुजर, फकिरा वाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिसरातील इतर नागरिक आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound