Home Cities जळगाव श्रीराम रथोत्सवाच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा नको; उपमहापौर मनोज चौधरींचा अधिकाऱ्यांना इशारा

श्रीराम रथोत्सवाच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा नको; उपमहापौर मनोज चौधरींचा अधिकाऱ्यांना इशारा

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीडशे वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा असलेल्या आणि संत आप्पा महाराजांनी सुरू केलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव व वहनोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी रथ आणि विविध वहनांच्या संपूर्ण मिरवणूक मार्गांची तातडीने व सखोल स्वच्छता करण्याचे स्पष्ट आदेश महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना दिले आहेत.

कार्तिक शुक्ल एकादशीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या पारंपरिक उत्सवात प्रभू श्रीरामाचा रथ व विविध वहनांच्या भव्य मिरवणुकीत खान्देशातील हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक लोकोत्सवात दर्शनासाठी आणि रथ ओढण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले. मिरवणूक मार्गावरील कचरा नियमित उचलणे, रस्ते पूर्णपणे स्वच्छ करणे, बंद पडलेले नाले व गटारींची सखोल सफाई करणे तसेच आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. उत्सवापूर्वी आणि प्रत्यक्ष उत्सवादरम्यान शहरातील स्वच्छतेत कोणतीही हयगय किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशाराही उपमहापौरांनी यावेळी दिला.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्यासह आरोग्य विभागाचे समीर बोरोले, तसेच शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी (BVG) संस्थेचे व्यवस्थापक रेड्डी, जाधव आणि राठोड हे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर उपमहापौरांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मिरवणूक मार्गांची पाहणी करून स्वच्छतेच्या कामाला तात्काळ गती देण्याच्या आणि उत्सवापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव व वहन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आरोग्य विभाग व बीव्हीजी संस्थेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी रथमार्गावरील रस्ते, नाले व गटारींची तातडीने सखोल स्वच्छता करून जंतुनाशक फवारणी करण्याचे स्पष्ट आदेश देत स्वच्छतेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound