जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघारीसाठी अवघा एक दिवस उरला असतांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केलेले विनोद तराळ आणि देवयानी चंद्रकांत देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दाखल केलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगर तालुक्यातून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासोबत येथूनच शिवसेनेचे विनोद रामदास तराळ व देवयानी चंद्रकांत देशमुख यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर रक्षाताई खडसे यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.
रक्षाताई खडसे यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक १६०९०/२०२६ आणि १६०९१/२०२६ यांवर न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्यासमोर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनावणी झाली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन यांनी, तर प्रतिवादींच्या वतीने ॲड. एस. के. कदम यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान प्रतिवादींच्या वकिलांनी एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे, ही प्रस्थापित कायदेशीर भूमिका असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. एखादा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आल्याची तक्रार असल्यास त्यास निवडणूक याचिकेच्या माध्यमातून आव्हान देता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कायदेशीर भूमिकेकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या ज्येष्ठ वकिलांनीदेखील संबंधित मुद्दा मान्य केला. त्यानंतर न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दोन्ही रिट याचिका सुनावणीयोग्य नसल्याच्या कारणावरून फेटाळून लावल्या. मात्र, या आदेशातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा पुढील कायदेशीर मार्ग बंद केलेला नाही. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर संबंधित उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत योग्य त्या निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आता उद्या शेवटच्या दिवशी मुक्ताईनगर मतदारसंघातील जागा बिनविरोध होणार की येथे लढत होणार ? याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.



