जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज अमळनेर सोसायटी मतदारसंघातून प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.
अमळनेर विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघात आमदार अनिल पाटील यांच्या सौभाग्यवती जयश्री अनिल पाटील यांच्या समोर भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी दाखल केली होती. यामुळे येथे जोरदार लढत होणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, उमेदवारी अर्ज मागे घेण्याला एक दिवस उरला असतांना आज प्रफुल्ल पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे जयश्री अनिल पाटील या अमळनेर सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत अधिकृतपणे महायुतीची घोषणा होण्याआधीच अमळनेरातून जयश्री पाटील यांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात अमळनेरची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असेल हे स्पष्ट झाले आहे.



