Home क्राईम पाचोऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! सलग दुसऱ्या दिवशी घरात घुसलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडले ;...

पाचोऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! सलग दुसऱ्या दिवशी घरात घुसलेल्या चोरट्याला नागरिकांनी पकडले ; कृष्णापुरीत मध्यरात्री थरार

0
1

जळगाव/पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कृष्णापुरी परिसरातील एका घरात चोरटा शिरला होता. मात्र, घरातील सतर्क वयोवृद्ध महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत चोरट्याला पकडले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना एका घरात चोरट्याने प्रवेश केला. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या चोरट्याची चाहूल घरातील वयोवृद्ध महिलेला लागली. त्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड सुरू केली. महिलेचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी घरात घुसलेल्या संशयित चोरट्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, पकडलेला संशयित चोरटा मालेगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. मात्र, त्याची ओळख आणि चोरीच्या उद्देशाने तो घरात कसा शिरला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, पाचोरा शहरात सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुरुवारी समर्थ व्हॅली परिसरातही चोरीच्या उद्देशाने आलेल्या संशयिताला नागरिकांनी पकडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कृष्णापुरी परिसरात पुन्हा अशीच घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी संशयित व्यक्तींचा वावर वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः मध्यरात्री घरात घुसण्याच्या घटनांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound