Home Cities जामनेर जामनेरच्या विकासासाठी जमीन हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय; रेल्वे प्रकल्पांनाही फायदा

जामनेरच्या विकासासाठी जमीन हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय; रेल्वे प्रकल्पांनाही फायदा

0
1

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बहुप्रतिक्षित तालुका क्रीडा संकुल, नगरपरिषदेचे विकास प्रकल्प आणि महत्त्वाच्या रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. मध्य रेल्वे भुसावळ यांच्या मालकीच्या जामनेर येथील जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात ६.६४ हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाकडे प्रत्यार्पित करण्यास आणि त्या बदल्यात रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी समान किंमतीची १७.२८ हेक्टर शासकीय जमीन रेल्वे विभागास प्रदान करण्यास राज्य शासनाने पूर्वमान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि विशेष पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे जामनेर (जि. जळगाव) येथील गट क्रमांक ९९१ मधील १३.३० हेक्टर क्षेत्रापैकी ९.०० हेक्टर जमीन जामनेर नगरपरिषदेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी, तर उर्वरित ४.३० हेक्टर जागा अद्ययावत क्रीडा संकुलासाठी उपलब्ध होणार आहे. सद्यःस्थितीत थेट जमीन अदलाबदलीबाबत कायद्यात थेट तरतूद नसल्याने, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वे भुसावळ यांच्याकडून ६.६४ हेक्टर जमीन विनामोबदला महाराष्ट्र शासनाकडे प्रत्यार्पित केली जाणार आहे.
या बदल्यात शासनाकडून रेल्वे विभागाच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एकूण १७.२८ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य प्रदान केली जाईल. यामध्ये ‘मनमाड-इंदोर नवीन रेल्वे लाईन’ (मनमाड ते धुळे ते नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर) या प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातील १० गावांमधील १२.९३ हेक्टर जमीन आणि ‘जामनेर ते पाचोरा नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करून बोदवडपर्यंत विस्तारीकरण’ या प्रकल्पासाठी जळगाव जिल्ह्यातील ८ गावांमधील ४.३५ हेक्टर शासकीय जमीन रेल्वे विभागास दिली जाणार आहे. या संपूर्ण महसुली व प्रशासकीय कार्यवाहीची अंमलबजावणी धुळे व जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अधिकारात पूर्ण करण्यात येईल.
“जामनेरमधील क्रीडा संकुल, नगरपरिषदेचे विकास प्रकल्प आणि या भागातील रेल्वेचे प्रकल्प विकासाला नवी गती देणारे आहेत. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जमीन अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जामनेरच्या सर्वांगीण विकासाचा आणि रेल्वे विस्तारीकरणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार हे लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होते,” असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound