Home Cities जळगाव गिरणा धरणातून तीन बिगरसिंचन, तर शेतीसाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन ; पाणीटंचाईवर...

गिरणा धरणातून तीन बिगरसिंचन, तर शेतीसाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन ; पाणीटंचाईवर मंत्र्यांचा मोठा निर्णय!

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी उन्हाळ्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरासाठी तीन बिगरसिंचन आवर्तने, तर शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा देण्यासाठी एक सिंचन आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवतानाच शेतीच्या सिंचनालाही प्राधान्य देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या पाणी नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गिरणा प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, औद्योगिक वापर, शेतीसाठी सिंचनाचे नियोजन आणि कालव्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, दुष्काळाच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांनाही आवश्यक सिंचनाचा आधार मिळावा, यासाठी दूरदृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या हिताकडेही दुर्लक्ष होता कामा नये. यासाठी जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने तीन बिगरसिंचन व एक सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर करून पाण्याची नासाडी रोखावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आगामी उन्हाळ्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईचा आतापासूनच वेध घेऊन नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. केवळ सध्याची पाण्याची उपलब्धता लक्षात न घेता भविष्यातील गरजांचाही विचार करावा. पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापर यांचा समतोल राखून उपलब्ध जलसाठ्याचे योग्य वितरण करावे. संभाव्य टंचाईग्रस्त भागांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गिरणा कालव्याच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचण्यासाठी वितरण व्यवस्था सक्षम करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरणा कालव्यावरील सर्व पाटचाऱ्या आणि वितरिकांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. कालव्यांमधून होणारी पाण्याची गळती आणि नासाडी रोखून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही पुरेसे पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेली कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी व संबंधित अभियंत्यांनी कामांची नियमित पाहणी करून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवावे. कामांमध्ये विनाकारण विलंब किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. दरम्यान, ओझर-टाकरखेडा ते दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या पाइपलाइनचे सुमारे तीन किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण असल्याचा मुद्दा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थित केला. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच धरणातून आवर्तनाचे पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर केटी वेअरमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचनाही मंत्री सावकारे यांनी केली. बैठकीत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांनी जिल्ह्यातील पाणी नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. तर जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठा आणि संबंधित नियोजनाची माहिती सादर केली.

या बैठकीस आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जळगाव महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, अधीक्षक अभियंता संतोष भोसले, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी, उत्तम दाभाळे, सहाय्यक अभियंता वैष्णवी तोडकरी, उपविभागीय अधिकारी सुभाष चव्हाण, विजय जाधव, के. आर. पाटील, एस. जी. चौधरी, पी. एम. पाटील, अशासकीय सदस्य प्रशांत पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound