जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमधील आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा २०२६ मध्ये त्यांच्या कवितेची विशेष दखल घेत त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट भावस्पर्शी सन्मानपत्राने गौरविण्यात आले. समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या जीवनकार्यावर आधारित त्यांच्या कवितेने परीक्षकांसह रसिकांचीही मने जिंकली.
नवरात्रोत्सवानिमित्त ‘करूया स्त्री शक्तीचा जागर’ या संकल्पनेतून या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत किरण पाटील यांनी ‘न्यायमूर्तींच्या सोबतीने ज्ञानाचा दीप दिला’ या आशयाच्या कवितेतून रमाबाई रानडे यांच्या जीवनकार्याचे प्रभावी चित्रण केले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या साथीने रमाबाईंनी समाजसुधारणेच्या कार्यात दिलेले योगदान, अंधश्रद्धा आणि जुन्या रूढींविरुद्ध केलेला संघर्ष तसेच स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य त्यांनी आपल्या कवितेतून सुंदर शब्दांत मांडले. या राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील शेकडो नामवंत आणि नवोदित कवींनी आपल्या कविता पाठवून सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत किरण विठ्ठल पाटील यांनी आपल्या प्रभावी लेखनशैलीच्या बळावर विशेष बहुमान मिळवला. रमाबाई रानडे यांच्या कार्याचा ऐतिहासिक संदर्भ आणि स्त्रीशक्तीचा जागर यांचा सुरेख संगम त्यांच्या कवितेतून साधण्यात आला होता.

महिलांचे सक्षमीकरण, स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेच्या चळवळीतील महिलांचे योगदान या विषयांना त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडले. इतिहासातील स्त्रीशक्तीचा जागर घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या कवितेतून झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. या यशाबद्दल किरण विठ्ठल पाटील यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वाशिम-मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्यामभाऊ लक्ष्मीबाई रामचरण खोडे, कारंजा-मानोरा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके तसेच जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे माजी अध्यक्ष एस. डी. भिरुड यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.



