Home आरोग्य दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी उपक्रमाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडून कौतुक!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी उपक्रमाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडून कौतुक!

0
5

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आरोग्याची सुविधा मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून वरणगाव येथील ‘वासुदेव नेत्रालया’ने मोफत चष्म्याचा नंबर काढून देण्याचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तसेच या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकरीही आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीतील अडचणी आणि आर्थिक विवंचनेमुळे अनेक शेतकरी स्वतःच्या आरोग्याकडे, विशेषतः डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन वासुदेव नेत्रालयाच्या संचालिका डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नितू पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी हा विशेष उपक्रम सुरू केला आहे.

प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी नेत्रालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत नेत्रतपासणी उपक्रमाची माहिती जाणून घेतली. आर्थिक अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने मदतीचा हात देणे ही कौतुकास्पद आणि गरजेची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. “दुष्काळाच्या या कठीण काळात वरणगाव परिसरातील बळिराजाला आरोग्याच्या माध्यमातून मदतीचा हात देणे हे अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे,” अशा शब्दांत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी नेत्रालयाच्या संचालिका आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस आणि सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

नोव्हेंबर २०१४ पासून वासुदेव नेत्रालयाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि लोकहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. याच सामाजिक कार्याचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या या विशेष शिबिराला प्रांताधिकाऱ्यांच्या भेटीमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. हे शिबिर ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, दररोज सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शेतकऱ्यांना मोफत चष्म्याचा नंबर तपासून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी शिबिराला सुटी राहणार आहे. वरणगाव परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वासुदेव नेत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound