फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखाना लि.च्या २५२ शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. कारखान्याने २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीत कपात केलेल्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेत चौथ्या टप्प्यातील ७ लाख ८७ हजार रुपयांचा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार आहे. यासंदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समितीची बैठक २ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडली.
मंत्री समितीच्या निर्णयानुसार, मधुकर सहकारी साखर कारखान्याने संबंधित कालावधीत शेतकऱ्यांकडून कपात केलेल्या ठेवी परत करण्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत चौथ्या टप्प्यात १४ ऑगस्ट २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील सादर केले होते, अशा एकूण २५२ शेतकऱ्यांची परताव्यासाठी निवड करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यांत एकूण ७ लाख ८७ हजार रुपये जमा करण्यात येणार असून, संबंधित रकमेचा धनादेश आजच्या समितीच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी कारखान्याच्या एकूण २३ हजार १२२ शेतकऱ्यांपैकी ६ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एकूण ३ कोटी ९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना परतावा मिळावा यासाठी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्यांचे तपशील सादर केलेले नाहीत, त्यांनी आवश्यक तपशील संबंधित यंत्रणेकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक खात्यांची माहिती उपलब्ध झाल्यानंतर परताव्याची पुढील प्रक्रिया सुलभ होणार आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) श्री. विशाल जाधवर, समितीच्या अध्यक्ष तथा प्रादेशिक उपसंचालक श्रीमती भारती ठाकूर, समिती सदस्य व द्वितीय विशेष लेखापरीक्षक श्री. अरविंद नीचळ, माजी नगराध्यक्ष श्री. नीलेश राणे, श्री. ललित बोंडे आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. रत्नदीप वायकोळे उपस्थित होते.



