Home Cities यावल दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावलच्या पाणीपुरवठ्यासाठी शेळगाव बॅरेज योजनेला निधी द्या ; नगराध्यक्ष छायाताई...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावलच्या पाणीपुरवठ्यासाठी शेळगाव बॅरेज योजनेला निधी द्या ; नगराध्यक्ष छायाताई पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
5

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन यावल शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुरू असलेल्या शेळगाव बॅरेज पाणीपुरवठा योजनेच्या उर्वरित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या योजनेसाठी राज्य शासनाकडे सकारात्मक शिफारस करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

यावल शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने हतनूर धरणावर अवलंबून आहे. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता आगामी काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आवर्तनाबाबत अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचे आवर्तन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यास शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर यावल नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शेळगाव बॅरेज येथून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे काम सध्या सुमारे ५० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. निधीअभावी काम रखडल्यास आगामी उन्हाळ्यात शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. शेळगाव बॅरेज येथून पाणीपुरवठा करणारी ही योजना पूर्ण झाल्यास यावल शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना करता येईल. तसेच हतनूर धरणावरील पाणीपुरवठ्याचे अवलंबित्व कमी होऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत होईल. आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निवेदनात नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि आगामी काळातील संभाव्य टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन योजनेच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे शिफारस करण्याची मागणी केली आहे. निधी वेळेत उपलब्ध झाल्यास योजनेचे काम लवकर पूर्ण करून शहरवासीयांना दिलासा देता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावल शहरातील नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी या जनहिताच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.


Protected Content

Play sound