Home Cities जळगाव भोकर एसबीआय दरोडा प्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेची चौकशी करा : प्रा. भाऊसाहेब सोनवणे

भोकर एसबीआय दरोडा प्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेची चौकशी करा : प्रा. भाऊसाहेब सोनवणे

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत झालेल्या ३६ कोटी रुपयांच्या दरोड्याच्या गंभीर घटनेनंतर स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच भोकर गावात नागरिकांच्या आणि वित्तीय संस्थांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भोकर येथील एसबीआय शाखेत घडलेला दरोडा हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार असल्याचे प्रा. सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे. बँकांसारख्या महत्त्वाच्या वित्तीय संस्थांची सुरक्षा, गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवणे, गुप्तचर यंत्रणा सक्रिय ठेवणे आणि परिसरात नियमित पोलीस गस्त घालणे ही स्थानिक पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र, एवढ्या मोठ्या स्वरूपाचा दरोडा घडल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलीस प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे आणि गलथान कारभारामुळे दरोडेखोरांचे धाडस वाढले का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षकांसह जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या दरोडा प्रकरणात भोकर येथील जागरूक ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस विशेष कौतुकास्पद असल्याचेही प्रा. सोनवणे यांनी नमूद केले आहे. पोलिसांची मदत मिळण्यापूर्वी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नागरिकांनी दाखवलेली ही तत्परता निश्चितच अभिनंदनीय आहे. मात्र, प्रत्येक वेळी ग्रामस्थांनीच स्वतःचा जीव धोक्यात घालून गुन्हेगारांचा सामना करणे अपेक्षित नाही. नागरिकांच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भोकर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, आर्थिक उलाढाल तसेच गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या भागात कायमस्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सध्याच्या पोलीस ठाण्यापासूनचे अंतर आणि अपुऱ्या पोलीस गस्तीमुळे गुन्हेगारांवर अपेक्षित वचक राहत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. स्वतंत्र पोलीस चौकी सुरू झाल्यास परिसरात नियमित गस्त, तातडीने पोलीस मदत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भोकर गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, बँका व वित्तीय संस्थांना सुरक्षा पुरविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस चौकी तातडीने स्थापन करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर एसबीआय दरोडा प्रकरणातील स्थानिक पोलिसांच्या कथित निष्क्रियतेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, अर्जुन सोनवणे, सुरेश पवार, किरण बारोड, लोटन सोनवणे आणि प्रभाकर कोळी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound