Home Cities जळगाव जळगावात IDBI बँक कर्मचाऱ्यांचे दोन दिवस काम बंद आंदोलन ; खासगीकरणाविरोधात जोरदार...

जळगावात IDBI बँक कर्मचाऱ्यांचे दोन दिवस काम बंद आंदोलन ; खासगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, २ आणि ३ नोव्हेंबर असे दोन दिवस देशव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे पडसाद जळगावातही उमटले असून, शहरातील काव्यरत्नावली चौकात बँक कर्मचारी एकत्र येत केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. बँकेतील हिस्सेदारी विदेशी कंपनीला विकण्याच्या प्रस्तावाला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

आयडीबीआय बँकेचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवावे आणि खासगीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बँकेची मालकी आणि व्यवस्थापनातील सरकारी सहभाग कमी करून खासगी क्षेत्राकडे नियंत्रण देण्याच्या हालचालींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः विदेशी कंपनीला बँकेतील हिस्सेदारी विकण्याच्या प्रस्तावामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जळगावातील काव्यरत्नावली चौकात एकत्र आलेल्या बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासगीकरणाच्या प्रस्तावाचा निषेध केला. केंद्र सरकारने बँकेच्या भवितव्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून सर्वसामान्य ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेली सार्वजनिक सेवा आहे. त्यामुळे तिचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. खासगीकरणाच्या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीची सुरक्षितता, वेतन आणि निवृत्तिवेतनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नोकरी, वेतन आणि पेन्शन यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची सरकार आणि बँक व्यवस्थापनाने हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, २ आणि ३ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनानंतरही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनाचा परिणाम बँकेच्या नियमित कामकाजावर होण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना शाखांमधील आर्थिक व्यवहार, धनादेश, रोख रक्कम काढणे आणि इतर बँकिंग सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या महत्त्वाच्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन करून ठेवण्याची गरज आहे.


Protected Content

Play sound