वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे लोहपुरुष आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव येथे यंदा पारंपरिक जल्लोषाला फाटा देत वैचारिक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली. डीजे आणि बँडऐवजी सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाचे आयोजन करून सकल लेवा समाजातील तरुणांनी महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. त्यामुळे वरणगावात यंदा नाचून नव्हे, तर ऐकून सरदार पटेल जयंती साजरी झाली.
या कार्यक्रमात सावदा येथील व्याख्याते नंदकिशोर घनश्याम पाटील सर यांनी ‘सरदार : जीवनदर्शनी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी लेवा पंच मंडळाचे अध्यक्ष किशोर भंगाळे यांनी व्याख्याते नंदकिशोर पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हितेश भंगाळे यांनी केले. व्याख्यानातून नंदकिशोर पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर देशातील संस्थानांचे विलीनीकरण हे मोठे आव्हान होते. सरदार पटेल यांनी आपल्या कुशल नेतृत्व, मुत्सद्देगिरी आणि साम, दाम, दंड, भेद या नीतीचा प्रभावी वापर करून हे आव्हान पेलले. अवघ्या १८ महिन्यांत ५६३ संस्थाने भारतात विलीन करून अखंड भारताच्या निर्मितीत त्यांनी ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या या अतुलनीय कार्यामुळेच त्यांना ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाते, असे पाटील यांनी सांगितले.

सरदार पटेल यांना ‘सरदार’ ही पदवी महिलांकडून मिळाल्याचा ऐतिहासिक संदर्भही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या नेतृत्वगुणांचा, राष्ट्रनिष्ठेचा आणि देशाच्या एकात्मतेसाठी केलेल्या कार्याचा परिचय करून देताना त्यांनी पटेल यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग विशद केले. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच नंदकिशोर पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजक असलेल्या तरुणांचे विशेष अभिनंदन केले. आजच्या काळात जयंती आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये डीजे व बँडचा वाढता वापर पाहता, त्याला फाटा देऊन महापुरुषांचे विचार आणि जीवनकार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजातील कार्यक्रम सात्त्विक, वैचारिक आणि संस्कारक्षम पद्धतीने साजरे व्हावेत, असा संदेश देत त्यांनी डीजे संस्कृतीऐवजी विचारसंस्कृतीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. महापुरुषांच्या जयंती केवळ उत्साहात साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमातून वरणगावातील तरुणांनी सामाजिक उत्सवांना वैचारिक अधिष्ठान देण्याचा सकारात्मक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. कार्यक्रमाला तरुणांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



