Home Cities चोपडा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन व बौद्ध विहाराचे...

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन व बौद्ध विहाराचे लोकार्पण

0
21

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ करण्यात आला. गावातील नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचे भूमिपूजन, नवनिर्मित बौद्ध विहाराचे लोकार्पण तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन आमदार सोनवणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याप्रसंगी आमदारांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
किनगाव खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष पुढाकाराने २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या नवीन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असून, या कामाचे भूमिपूजन आमदार सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, किनगाव खुर्दच्या सरपंच रूपाली कोळी, उपसरपंच रियाज तडवी, ग्रामपंचायत सदस्य साजिद शहा, राहुल साळुंखे, वैशाली संजय पाटील, कल्पना रतन वानखेडे, ताहेर तडवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर आमदार प्रा. सोनवणे यांच्या स्थानिक विकास निधीतून तब्बल २० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य बौद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. नव्याने उभारलेल्या या बौद्ध विहाराच्या लोकार्पण प्रसंगी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्ध विहाराच्या उभारणीमुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.
यासोबतच, किनगाव खुर्द गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध चौक, मोक्याची ठिकाणे व संवेदनशील परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पणही आमदारांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बाळू पाटील, शांताराम कोळी, रामराव पाटील, संजय महाजन, जगदीश कोळी, संजय कोळी, निळकंठ पाटील, सुरेश तायडे, रवींद्र सपकाळे, नवल कोळी, अशोक कोळी, पिना कोळी, मिलिंद कोळी, रतन वानखेडे, ग्रामसेविका सोनाली सोनवणे, संतोष तायडे, प्रकाश वाणी तसेच उमेद महिला बचत गट व संत रविदास महाराज महिला बहुउद्देशीय बचत गटाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विकासकामांच्या लोकार्पणानंतर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेला अचानक भेट दिली. शाळेत नुकत्याच झालेल्या देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटीच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी आपुलकीने हितगुज केले व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्याला आपण पहिले प्राधान्य देऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते २५ लाखांच्या ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन, २० लाखांच्या बौद्ध विहाराचे लोकार्पण आणि १२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच आमदारांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Protected Content

Play sound