Home Cities जळगाव भंगार बाजारातील दुकानदारांना नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करा; एकता संघटनेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निवेदन

भंगार बाजारातील दुकानदारांना नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करा; एकता संघटनेचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निवेदन

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौक येथील भंगार बाजारातील ११७ दुकाने ३० सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या कारवाईत पाडण्यात आल्याचा दावा करत, प्रभावित दुकानदारांना नुकसानभरपाई आणि पुनर्वसन मिळावे, यासाठी एकता संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे फारुक शेख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, हा बाजार पूर्वीच्या नगरपालिकेने स्थलांतरित केला होता. तसेच १९९७ मध्ये ९९ वर्षांच्या करारासंदर्भात ठराव झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन कार्यवाही सुरू असून, कारवाईनंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
दुकाने पाडल्यामुळे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराच्या दुकानाचे, मालसाठ्याचे आणि व्यवसायाचे नुकसान स्वतंत्रपणे नोंदवून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुनर्वसन होईपर्यंत तात्पुरती व्यवसायाची जागा आणि उपजीविकेसाठी आर्थिक मदत द्यावी. तसेच प्रभावित दुकानदारांना कायमस्वरूपी पर्यायी दुकाने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही संघटनेने केली आहे. या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली आहे.
“११७ दुकाने म्हणजे केवळ बांधकाम नव्हे, तर ११७ कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. या कुटुंबांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. नुकसानभरपाई आणि सन्मानजनक पुनर्वसन मिळेपर्यंत कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू राहील,” असा इशारा फारुक शेख यांनी दिला.

Protected Content

Play sound