Home Cities जळगाव MPSC परीक्षेत यशासाठी दररोज पुरावा कायद्याची दोन कलमे आणि एका न्यायालयीन निकालाचा...

MPSC परीक्षेत यशासाठी दररोज पुरावा कायद्याची दोन कलमे आणि एका न्यायालयीन निकालाचा अभ्यास करा : ॲड. सुनील कुमार चोरडिया

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज -ॲड. संजय सपकाळे  । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग-१) आणि विधी अधिकारी पदांच्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, कायद्याच्या कलमांचे आकलन आणि न्यायालयीन निकालांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी दररोज भारतीय साक्ष अधिनियमातील किमान दोन कलमे वाचावीत, तसेच किमान एका महत्त्वाच्या किंवा अलीकडील न्यायालयीन निकालाचा अभ्यास करावा, असा महत्त्वपूर्ण सल्ला जळगावचे सहाय्यक संचालक तथा मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड. सुनील कुमार चोरडिया यांनी दिला.

जळगाव वकील संघाच्या वतीने MPSC मार्फत आयोजित सहाय्यक सरकारी अभियोक्ता आणि विधी अधिकारी पदांच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण वकिलांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. चोरडिया मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दर्शन देशमुख होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष ॲड. राजेश गवई, सचिव ॲड. आशिष पाटील आणि सहसचिव ॲड. मंगला पाटील उपस्थित होते.

ॲड. चोरडिया यांनी सरकारी अभियोक्त्यांच्या निवड प्रक्रियेची माहिती देताना फौजदारी प्रक्रिया संहितेतील (CrPC) कलम २४ व २५ तसेच नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील (BNSS) कलम १८, १९ आणि २० यांमधील तरतुदींच्या अनुषंगाने नियुक्ती प्रक्रियेचे स्पष्टीकरण केले. सरकारी अभियोक्ता पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी कायद्याच्या तरतुदी केवळ पाठ न करता त्यांचा व्यावहारिक उपयोग समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सहाय्यक सरकारी अभियोक्ता (APP), अतिरिक्त सरकारी वकील (AGP) आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्या भूमिका, कार्यपद्धती व जबाबदाऱ्या यांतील फरकही त्यांनी स्पष्ट केला. यासोबतच जिल्हा सरकारी वकील (DGP), पाच जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे उपसंचालक (अभियोजन) आणि संचालक (अभियोजन) या पदांची कार्ये, अधिकार व प्रशासकीय जबाबदाऱ्यांची माहिती दिली. या पदांशी संबंधित कायदेशीर तरतुदी आणि प्रशासकीय रचना समजून घेतल्यास परीक्षेच्या तयारीला दिशा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. परीक्षेचा अभ्यास करताना नियमितपणा आणि नियोजनाला विशेष महत्त्व असल्याचे नमूद करत त्यांनी उमेदवारांना दररोज अभ्यासाचे निश्चित उद्दिष्ट ठेवण्याचा सल्ला दिला. भारतीय साक्ष अधिनियमातील कलमांचा नियमित अभ्यास, महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांचे विश्लेषण आणि कायद्याच्या तरतुदींची उजळणी यांवर भर दिल्यास विषयाचे आकलन अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी ॲड. गणेश अनाराथे यांनीही सहाय्यक सरकारी अभियोक्ता परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि तयारीची दिशा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कायद्याचे ज्ञान, त्याचा प्रत्यक्ष वापर आणि प्रश्नांचा अभ्यास यांचा समन्वय साधण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. दरम्यान, जळगाव वकील संघाच्या सहसचिव ॲड. मंगला पाटील यांची नुकतीच विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शन सत्रानंतर प्रश्नोत्तर आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात ॲड. अविनाश खडके, ॲड. कल्पना शिंदे आणि ॲड. शिल्पा रावेरकर यांनी सहभाग घेतला. तरुण वकिलांनी आपल्या शंका उपस्थित केल्या आणि परीक्षेच्या तयारीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या कार्यक्रमाला वरिष्ठ फौजदारी वकील प्रकाश बी. पाटील, ॲड. विजय शर्मा, ॲड. देवेंद्र सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक तरुण वकील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघाचे सचिव ॲड. आशिष पाटील यांनी केले, तर उपाध्यक्ष ॲड. राजेश गवई यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound