Home Cities जळगाव जळगावात ‘नारी Verse’ युवती संमेलन उत्साहात 

जळगावात ‘नारी Verse’ युवती संमेलन उत्साहात 

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । युवतींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘नारी Verse’ युवती संमेलन बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ‘शिक्षित, सशक्त, स्वावलंबी नारी’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित या संमेलनाला जळगाव शहरासह विविध भागांतून युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवतींनी आपल्या क्षमता ओळखून विविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने पुढे यावे, नेतृत्वाची भूमिका स्वीकारावी आणि स्वावलंबी बनावे, या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणासोबतच कौशल्य, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि मानसिक सक्षमता या बाबी युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

संमेलनास जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले, उद्योजिका श्रीमती वंदना पाटील, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती देशमुख, अभाविप केंद्रीय कार्यसमिती सदस्य कु. वैभवी ढिवरे, जळगाव विभाग संयोजक कु. गायत्री पाटील तसेच संमेलन प्रमुख कु. प्राची दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवतींच्या शिक्षणापासून स्वावलंबनापर्यंत तसेच उद्योजकता, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास, सुरक्षितता आणि नेतृत्वक्षमता अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाताना युवतींनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले.

महिलांनी विविध क्षेत्रांत मिळविलेले यश आणि निर्माण केलेले कर्तृत्व युवतींसाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थित वक्त्यांनी अधोरेखित केले. स्वतःच्या प्रगतीसोबतच कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीतही युवतींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश संमेलनातून देण्यात आला. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून कौशल्यविकास, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणेही गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर युवतींना त्यांच्या ध्येयांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी तसेच भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करण्यासाठी ‘नारी Verse’ हे प्रभावी व्यासपीठ ठरले.

संमेलनादरम्यान युवतींचा उत्साह आणि सक्रिय सहभाग प्रकर्षाने जाणवत होता. विविध भागांतून आलेल्या युवतींनी कार्यक्रमातील मार्गदर्शनाचा लाभ घेतला. स्वतःची स्वप्ने मोठी ठेवत ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला. युवतींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरणालाही या उपक्रमात महत्त्व देण्यात आले. स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहण्यासोबतच जबाबदारीची जाणीव ठेवून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound