यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात १५ वर्षीय निहारिका अनिल कोळी हिचा झालेला संशयास्पद मृत्यू गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी समाजबांधवांनी यावल तहसीलदारांना निवेदन देत शेतकी संघापासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चाही काढला.
यावल येथील शेतकी संघाच्या परिसरात जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या समाजबांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निहारिका कोळी हिच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा करण्यात आली. घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन मृत्यूमागील सत्य समोर यावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बैठकीनंतर शेतकी संघापासून यावल तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात समाजबांधव, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात कोणतेही घोषवाक्य न देता शांततेच्या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला.

तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेमागील वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच निहारिकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे आणि नितीन सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. निहारिका कोळीच्या मृत्यू प्रकरणाची कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता चौकशी करण्यात यावी, घटनेतील सत्य समोर आणावे आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच निहारिकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष घालून निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबीयांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळण्यासाठी प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. या मूक मोर्चात यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी जमातीचे पदाधिकारी प्रभाकर आप्पा सोनवणे, सुभाष सोनवणे, अविनाश तायडे, कुदनभाऊ सोनवणे, नितीन सपकाळे, संदिपभैया सोनवणे, रोहीदास कोळी, भागवत कोळी, कैलास सपकाळे, संतोष सोनवणे, महेंद्र सपकाळे, भरत कोळी, गोकुळ कोळी, अनिल कोळी, सुरज कोळी, राहुल कोळी, विजय कोळी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



