Home Cities जळगाव जळगाव मनपाच्या महानोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद; १९४ सेवा पुरवठादारांची नोंदणी

जळगाव मनपाच्या महानोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद; १९४ सेवा पुरवठादारांची नोंदणी

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार विविध सेवा सहज उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिक कुशल मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या ‘महानोंदणी अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘रोजगार महाकुंभ’ आणि सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील तब्बल १९४ सेवा पुरवठादारांची नोंदणी करण्यात आली आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यात ‘रोजगार महाकुंभ’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जळगाव शहर महानगरपालिकेने दि.अं.यो.-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यरत शहर उपजीविका केंद्र (City Livelihood Centre – CLC) मार्फत ‘महानोंदणी अभियान’ आयोजित केले.

आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालिग्राम लहासे यांनी प्रास्ताविक करत अभियानाची उद्दिष्टे तसेच शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या विविध सेवांची माहिती दिली.

शहरातील नागरिकांना प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार, चालक, बांधकाम कामगार, घरगुती कामगार, स्वच्छता कर्मचारी यांसारख्या विविध सेवांची गरज नियमितपणे भासत असते. त्याचबरोबर कौशल्याधारित काम करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कौशल्याला अनुरूप काम मिळण्याची आवश्यकता असते. हीच गरज लक्षात घेऊन ‘महानोंदणी अभियान’ राबविण्यात आले.

या अभियानात प्लंबर, इलेक्ट्रिशियन/वायरमन, सुतार, ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक, कार चालक, बांधकाम कामगार, घरगुती काम करणाऱ्या महिला, स्वच्छता कर्मचारी, नर्स, वैद्यकीय सेवा पुरविणारे व काळजीवाहक, घरी जाऊन शिक्षण देणारे शिक्षक-शिक्षिका, सुरक्षा रक्षक, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, टेंट हाऊस व्यावसायिक** यांच्यासह विविध क्षेत्रांतील सेवा पुरवठादारांची नोंदणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, या अभियानात आतापर्यंत १९४ सेवा पुरवठादारांची नोंदणी झाली आहे. नोंदणीकृत सेवा पुरवठादारांची माहिती शहर उपजीविका केंद्रामार्फत संकलित केली जात असून, भविष्यात जळगाव शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार संबंधित सेवा पुरवठादाराशी संपर्क साधण्यासाठी CLC कडून मदत केली जाणार आहे.

अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी शहरातील अधिकाधिक सेवा पुरवठादारांनी शहर उपजीविका केंद्रामध्ये आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. CLC च्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक कुशल मनुष्यबळाला रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शहर उपजीविका केंद्रामार्फत ७०३०० ०९६०० हा संपर्क क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ‘एक कॉल – आवश्यक सेवा’ या संकल्पनेनुसार नागरिकांना त्यांच्या गरजेची सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान, जळगाव शहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रोजगार मेळाव्यात नोंदणीसाठी प्राप्त Google Form उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच शहरातील अधिकाधिक सेवा पुरवठादारांनी नोंदणी करावी यासाठी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विशेष नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नितीन जोशी तसेच दि.अं.यो.-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागातील सर्व समुदाय संघटकांनी विशेष प्रयत्न केले. आगामी काळात शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आणखी सेवा पुरवठादारांची नोंदणी करून नागरिकांना विविध सेवा एकाच संपर्क माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound