


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील नागरिकांच्या आणि शिवप्रेमींच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला पुन्हा एकदा आक्रमक इशारा देण्यात आला आहे. शहराच्या प्रवेशद्वाराचे नामकरण, नाट्यमंदिराचे सुशोभीकरण यासह इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित वाविस्कर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अमळनेर शहरातील विविध विकासकामे आणि शिवप्रेमींच्या भावनांशी जोडलेल्या मागण्या गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अमळनेर – धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वारास “छत्रपती शिवाजी महाराज” असे नाव देण्यात यावे, ही समस्त शिवप्रेमींची बहुप्रतिक्षित मागणी आहे. याशिवाय अमळनेर शहराच्या सांस्कृतिक आणि कलात्मक सौंदर्यात भर घालणाऱ्या नाट्यमंदिराचे तातडीने सुशोभीकरण करण्यात यावे, नाट्यमंदिर परिसरात उंच हॅमर्स लॅम्प बसविण्यात यावा तसेच तेथे दिमाखात फडकणारा भगवा ध्वज उभारण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो नागरिक, महिला, लहान मुले आणि युवक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी व विविध कार्यक्रमांसाठी अमळनेर शहरात एकत्र येत असतात. त्यामुळे शहरातील मुख्य आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य आणि आकर्षकता असणे आवश्यक आहे. नाट्यमंदिर हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ते अमळनेरच्या वैभवात भर घालणारे स्थान आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यापूर्वी म्हणजे शिवजयंती उत्सवाआधी या सर्व कामांना नगरपालिका प्रशासनाने प्राथमिकतेने पूर्ण करावे, अशी ठाम भूमिका शिवजन्मोत्सव समितीने घेतली आहे.
यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, ज्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत या सर्व मागण्यांवर प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन, उपोषण आणि इतर शांततामय मार्गाने लढा उभारला जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर राहुल अहिरे, जगदिश महाजन, भावेश साळुंखे, तुषार सोनार, शुभम पाटील, मनोज शिंगोणे, राहुल कंजर, भागवत पाटील, गणेश पाटील, अक्षय शिर्के, सागर विसपुते, योगेन्द्र बाविस्कर, आशिष अंधारे, आकाश माळी, प्रविण पाटील, छोटू पाटील, अमर सोनार, राकेश शेटे आणि विजय पाटील यांच्यासह अनेक शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



