Home प्रशासन यावल पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला SBIकडून १ कोटींची मदत ; सॅलरी पॅकेजअंतर्गत विम्याचा...

यावल पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला SBIकडून १ कोटींची मदत ; सॅलरी पॅकेजअंतर्गत विम्याचा लाभ

0
109


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) यावल शाखेच्या वतीने पोलिस सॅलरी पॅकेजअंतर्गत १ कोटी रुपयांची विमा मदत देण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन खाते यावल येथील SBI शाखेत असून, या खात्याला विमा संरक्षण असल्याने त्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

यावल पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी भरत विठ्ठल कोळी हे अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरून जळगावकडून यावलच्या दिशेने मोटारसायकलवरून येत असताना किनगाव ते यावलदरम्यान त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. भरत कोळी यांचे वेतन खाते भारतीय स्टेट बँकेच्या यावल शाखेत होते. पोलिस सॅलरी पॅकेजअंतर्गत त्यांच्या वेतन खात्याला विमा संरक्षण असल्यामुळे अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार SBI यावल शाखेच्या वतीने त्यांच्या वारसांना १ कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. धनादेश वितरणाच्या वेळी मयत पोलिस कर्मचारी भरत कोळी यांचे वडील विठ्ठल कोळी आणि त्यांच्या पत्नी रितू कोळी यांच्यासह SBI यावल शाखेचे व्यवस्थापक राधेश्याम मुंगमोळे उपस्थित होते. तसेच केशव चौधरी, दिनेश खडसे, श्रेया नाथ यांच्यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचीही उपस्थिती होती. अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात सॅलरी पॅकेजअंतर्गत मिळालेली ही विमा मदत कुटुंबीयांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पोलिस कर्मचारी भरत कोळी यांच्या वेतन खात्याशी संबंधित विमा संरक्षणामुळे त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली. SBIच्या सॅलरी पॅकेजअंतर्गत मिळालेल्या या लाभामुळे अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला आहे.


Protected Content

Play sound