


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किनगाव-जळगाव रस्त्यावरील कोळन्हावी चौफुली जवळ यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने गुप्त बातमीच्या आधारे कारवाई करत विनापास पंचराज जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. या कारवाईत वन विभागाने एक टाटा ७०९ वाहन आणि त्यातील लाखो रुपयांचे लाकूड ताब्यात घेतले असून वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास गस्ती पथक कोळन्हावी चौफुली परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. यावेळी टाटा कंपनीचे ७०९ वाहन (क्रमांक MH-18-D-7454) संशयास्पदरीत्या येताना दिसले. वन कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन रस्त्यावरच सोडून जवळच असलेल्या केळीच्या बागेत पळ काढला. कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यात सुमारे १३.०० घनमीटर पंचराज जळाऊ लाकूड आढळून आले. या लाकडाच्या वाहतुकीबाबत चालकाकडे किंवा वाहनात कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने टाटा ७०९ वाहनासह संपूर्ण लाकूड जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा केले आहे. या प्रकरणी वन गुन्हा क्रमांक २१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वागझिरा येथील वनपाल यांच्यामार्फत केला जात आहे. सदरची यशस्वी कारवाई यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक सौरिष सहाय, धुळे दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर आणि यावलचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, वनपाल संजय पाटील, वनरक्षक सतीश वाघमारे आणि वनरक्षक आय. बी. चव्हाण यांनी पार पाडली.



