


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषद क्षेत्रातील अतिक्रमण कारवाईवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नगरपरिषद प्रशासनाला प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने संबंधित अतिक्रमणधारकांना प्रशासनामार्फत जाहीर नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस प्रशासनाच्या नियमानुसारच काढण्यात आली असून, त्यावर प्रोटोकॉलनुसार नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची नावे नमूद करण्यात आली होती, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
नगराध्यक्ष छाया पाटील यांनी सांगितले की, सदर नोटीस प्रसिद्ध झाली त्यावेळी त्या व त्यांचे कुटुंबीय नाशिक येथे होते. नाशिकहून यावल येथे परतल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी त्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांनी स्वतः तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची भेट घेतली. हा विषय संबंधित विभागाच्या प्रशासनाशी निगडित असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केल्याचे नगराध्यक्षांनी म्हटले आहे.
यानंतर अतिक्रमणधारकांसह त्यांनी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाची बैठक घेण्यात आली. सध्या पोळा सण आणि त्यानंतर गणेशोत्सव असल्याने पोलीस प्रशासनावर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी २५ सप्टेंबरनंतर अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याचा अधिकार नगरपालिका प्रशासनास असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १७९, १८० आणि १८३ अन्वये नगरपरिषदेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ किंवा खुल्या जागांवरील तात्पुरते अथवा कायमस्वरूपी अतिक्रमण हटविण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अतिक्रमण कारवाईसाठी NHAI किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या स्वतंत्र लेखी आदेशाची कायदेशीर आवश्यकता नसल्याचे नगराध्यक्षांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. त्यामुळे यावल शहरातील सदर कारवाई नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त समन्वयातून करण्यात येणार होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच नगराध्यक्षांवर अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीचा पुरेसा अभ्यास न करता करण्यात आले असल्याचा दावा छाया पाटील यांनी केला. रावेर-यावल मतदारसंघातील फैजपूर आणि रावेर या भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अतिक्रमणधारकांना देण्यात आलेली नोटीस ही प्रशासनाच्या नियमानुसारच होती; मात्र सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे, अशी भूमिका नगराध्यक्षांनी स्पष्ट केली. शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस व नगरपालिका प्रशासनाने समन्वयाने निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
“यावल शहराच्या हितासाठी प्रशासनाने कायदेशीर व नियमानुसार केलेल्या प्रत्येक कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेऊन जनतेसमोर सत्य मांडावे, एवढीच आमची अपेक्षा आहे,” असे नगराध्यक्ष छाया पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



