


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात तातडीने पंचनामे करून दुष्काळसदृश अथवा कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुक्ताईनगर तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पिकांना आवश्यक वेळी पुरेसा पाऊस न मिळाल्याने केळी, कापूस, मका, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तीळ तसेच इतर हंगामी व बागायती पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि सिंचनासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट वाढत असून कर्जबाजारीपणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष शेतशिवाराची पाहणी करावी आणि सर्व गावांमध्ये पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील सद्यस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन दुष्काळसदृश किंवा कोरडी परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही अनावश्यक अट न लावता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासोबतच प्रलंबित पीक विम्याची नुकसानभरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी आणि चालू वर्षातील पीक विम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्जमाफी करावी किंवा कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, अशीही मागणी आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा मिळावा, नादुरुस्त किंवा अपुऱ्या क्षमतेच्या डीपी तातडीने दुरुस्त कराव्यात तसेच गरजेनुसार नवीन डीपी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. ई-पिक पाहणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी आणि आवश्यक शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जनावरांसाठी पुरेसा चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, तर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील परिस्थितीचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून विशेष आर्थिक मदतीसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांच्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना ॲड. राहुल अशोक पाटील, ॲड. देवेंद्र बोदडे, ॲड. अशोक बोदडे, अक्षय पालवे, वसीम मन्सुरी यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



